मुंबईचं वेगळेपण

मुंबई- या नगरीची चर्चा त्रिखंडात सदानकदा होतच असते. आज काय मेट्रो चालू झाली म्हणून, तर उद्या काय मेट्रो टॉकिजला अमुक वर्ष पूर्ण झाली म्हणून. मोनो पासून नॅनोपर्यंत सर्वांची भूक भागवणारी ही मुंबापुरी. कित्येकदा पुणेकरांनी टर उडवलेली ही मुंबई. एकदा तिची भुरळ पडली की मग तिला सोडवत नाही- आणि मग आपण तिचेच होऊन जातो. शेवटपर्यंत. कित्येक वर्षांपासून लोकांचे या शहराशी प्रेमसंबंध आहेत- जे मरेपर्यंत चिरतरुण राहतात. मुंबादेवीचे निवासस्थान असलेली ही मुंबई लोकांची स्वप्नपूर्ती करतच राहते. हे ताऱ्यांचे बेट गल्लीबोळातल्या माणसांपासून उच्चभ्रू वस्तीतील लोकांपर्यंत सर्वांना सामावून घेते. काही तरी खासियत आहे ह्या ‘City of Dreams’ ची. तीच मोजक्या शब्दांत मांडण्याचा हा प्रयत्न-

१. उत्तुंग इमारती– मुंबई मधली सगळ्यात पहिली गोष्ट जी लोकांना मुंबईकडे आकर्षित करत असेल तर ती म्हणजे इथल्या टोलेजंग इमारती. बघायला गेलं तर अंबानींचा अॅन्टीलिया हा बंगलाच २७ मजली आहे, मग अजून कशाला काय बघा. घरीच गच्चीवर हेलिपॅड असताना अजून कशाची गरजच काय? नुसत गच्चीवर जा, आणि “उडते” व्हा.

high rise buildings मुंबईचं mumbai Aasaanjobs

२. बॉलीवूड– “अये झिपरे, त्या दीपिकाचे केस बघ! नाहीतर तुझ्या झिंज्या”, असं अजब बोलणं कानावर आलं तर वावगं वाटायला नको. कारण, बॉम्बे आणि तिच्यात विसावलेले बॉलीवूड हे मुंबईकरांच्या नसानसांत भरलेलं आहे. इथे “कुत्तोंके सामने मत नाचना” म्हटलं तरीही बसंतीपासून जलेबीबाईपर्यंत सर्वच नाचतात. इथे डॉनच्या मागे ११ मुलखांमधील पोलीस लागले असले तरीही तो सुटून निघतोच.

Bollywood मुंबईचं mumbai Aasaanjobs

३. मुंबई लोकल– मुंबईत आल्यावर एकदातरी घ्यावाच असा हा अनुभव. तो सुखद असेल याची मात्र काहीही शाश्वती नाही. एकदा सकाळी ९ किंवा संध्याकाळी ६ वाजता कुठल्याही लोकलमध्ये पाय घातलात, तर अगदी शब्दशः सुतासारखे सरळ होऊन याल, कोणी वळण लावण्याची गरजच नाही. तिला पर्यायही आहेत ना, मेट्रो आहे – मोनो आहे. पण दिवसाला लाखोंचा भार वाहणाऱ्या या लोकल्स खरच मुंबईचा प्राण आहेत.

Mumbai local मुंबईचं mumbai Aasaanjobs

४. मान्सून- एप्रिल-मे मधील तळपत्या उकाड्यानंतर मुंबईकरांना दिलासा द्यायला येतो तो पावसाळा. मुंबईत एकदाचा पावसाळा सुरु झाला की परळ, हिंदमाता भागात पोहोण्याचे वर्गफुकटात घेतले जातात. मुंबईत आल्यावर मरीन ड्राईव्ह ला जाऊन पावसाचा आनंद लुटण्याची मजा काही औरच, आणि त्यातूनही समुद्राला भरती असेल तर मग लोकांना अजूनच चेव चढतो. मग सुरु होते ती कांदाभजी, मुगभजीची यथेच्च लयलूट.

monsoons मुंबईचं mumbai Aasaanjobs

५. मुंबईतला गणेशोत्सव- भले गणपती भारतात धुमधडाक्याने साजरा करत असतील, पण शेवटी मुंबईचा गणपती हा खासच असतो.गणेशगल्लीला जरी “मुंबईचा राजा” म्हणत असले, तरीही खरी गर्दी होते ती मराठमोळ्या “लालबागच्या राजा”कडेच. त्याच्या विसर्जन मिरवणुकीत मुंबईतील हिंदू-मुस्लीम सलोख्याचे दर्शन होते जेव्हा एका मुस्लीम प्राबल्य असलेल्या क्षेत्रात राजावर मुस्लीम लोक भक्तिभावाने पुष्पवृष्टी करतात. त्याच्या विसर्जनाने मुंबईतील गणेशोत्सवाची अधिकृतपणे “इति श्री” होते. ह्या दहादिवसांमध्ये लाखो गणेशमुर्त्या घराघरांत पुजल्या जातात. काय करणार,मुंबईकडे समुद्र आहे ना, मग “चर्चा तर होणारच”.

ganesh_utsav मुंबईचं mumbai Aasaanjobs

६. मुंबईचा डबेवाला- जागतिक स्तरावर नावाजली गेलेली व्यवस्था म्हणजे मुंबईचे डब्बेवाले. येथील लोकांना कमीत कमी वेळात घरगुती जेवण पोहोचवण्याचे काम हे डब्बेवाले करतात. लोकल्सच्या घुसमटून टाकणाऱ्या वातावरणातून रस्त्याच्या ट्राफिक वरून वाट काढत हे डब्बेवाले दिलेले डब्बे नेमक्या जागी पोहोचवतात. एका सर्वेक्षणानुसार दोन महिन्यातून एक चूक इतके बिनचूक यांचे काम असते. प्रिन्स चार्ल्सनी प्रभावित होऊन म्हणूनच त्यांना स्वतःच्या लग्नात बोलवलं होतं.

Mumbai dabbawala मुंबईचं mumbai Aasaanjobs

७. खाऊगल्ल्या- मुंबईत चमचमीत पदार्थ कमीत कमी किमतीत खायचे असतील तर खाऊगल्ल्यांशिवाय अजून कसला विचार येणे अशक्यच. मग तुम्ही पंजाबी असाल, बंगाली नाहीतर साउथ इंडिअन- तुमच्या घरची चव तुम्हाला इथेही मिळेल. चर्चगेटची असो, किंवा घाटकोपरची असो- इथे “आपल्या” लोकांसोबत आल्यावर तासभर तरी तुम्ही काही जागचे हटत नाही.

khau galli मुंबईचं mumbai Aasaanjobs

पण काहीही असो, ह्या सर्व गोष्टी मुंबईला “special” बनवतात. म्हणूनच की काय, एकदा इथे आल्यानंतर हे शहर सोडून जायची इच्छा काही होत नाही. एकदा माणूस इथे आला की तो मुंबईकरच होऊन जातो. जरी इथे तुम्हाला जगातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी दिसली, जरी इथे तुम्हाला भरगच्च गर्दी दिसली- तरी तुम्ही या शहराच्या अशा सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्यांसोबत जगायला शिकता. मुंबईकर असणं ही एक गोष्ट आपल्याला जगायला शिकवून जाते, म्हणूनच २६/११ सारख्या भयाण हल्ल्यानंतर २७/११ ला मुंबईकर कामांसाठी घराबाहेर पडतो.

To find entry level and blue collar jobs in Mumbai, visit our website here.